एकनाथ शिंदेंच्या पुढच्या प्लॅनिंगला दे धक्का; उद्धव ठाकरे करणार ‘कमबॅक’ comeback Udhav thakare?
शिवसेनेतून बंडखोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. सरकार स्थापन होऊन जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजीतून शिंदेंना जावं लागत आहे.
त्यामुळे शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला आहे.
गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जात होते. परंतु हा विस्तार पुढे ढकलला असल्याचं सांगण्यात येत आहे. खरे तर शिवसेनेतील बहुतांश बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये स्वत:ला मंत्री म्हणून पाहायचे आहे आणि त्यामुळेच अडचण निर्माण झाली आहे.
सध्या खरी शिवसेना कुणाची असा वाद सुरू आहे, जो सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. अशा स्थितीत मंत्रिपद न मिळाल्यास काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटासोबत जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. तसे झाले तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार अवघड जाईल.
काही आमदार गेले तर एकनाथ शिंदे गटाला पक्षांतर विरोधी कायद्याचा धोका निर्माण होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना पक्षाच्या ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. अशा परिस्थितीत पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी किमान ३७ आमदारांनी वाद मिटत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे.
त्यामुळे बंडखोर आमदारांपैकी ४ आमदारही वेगळे झाले तर ही संख्या ३६ पर्यंत कमी होऊन पक्षांतर कायदा लागू होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांची ही अडचण असल्याने ते आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची आस असणाऱ्या दुसऱ्या विस्ताराची वाट पाहत आहेत.
शिंदे गटाचे एक नेते म्हणाले, “सध्या हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय दोन्ही पक्षांची याचिकाही निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. मात्र अशावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्रिपद न मिळालेले नेते उद्धव ठाकरेंच्या गटात गेले तर खऱ्या शिवसेनेवरील हक्काचा आधारच कमकुवत होईल ().
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटातील ४० पैकी केवळ ९ आमदार मंत्री झाले आहेत. तर इतरांमध्ये नाराजी पसरली, ही नाराजी शिंदेंनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचं आश्वासन देऊन थोपवली आहे. परंतु जर त्यात स्थान मिळाले नाही तर नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता जास्तीत जास्त २३ लोकांना मंत्री बनवू शकतात मात्र अपेक्षा ठेवणाऱ्यांची यादी मोठी आहे. याशिवाय भाजपालाही काही मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत. अशा स्थितीत आमदारांना कसे शांत करायचे, हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर चिंतेचा विषय आहे.
किंबहुना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे भाजपचाही डोळा असून त्यांच्या आमदारांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत त्यांना आणखी मंत्रीपदे हवी आहेत. याशिवाय छोट्या पक्षांचे आमदारही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हे ही वाचा – Ice Cream Girl died : आईस्क्रिमचा हट्ट बेतला जीवावर, चार वर्षाच्या मुलीचा शॉक लागल्याने मृत्यू
सध्या शिवसेनेत दोन्ही गटाकडून आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरेंकडील आणखी १-२ आमदार आमच्या गटात सहभागी होतील असा दावा मंत्री संदीपान भुमरे करत आहेत. तर आधी तुमचे आहेत ते सांभाळा, त्यातील काही आमच्यात संपर्कात आहेत असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिले आहे.