राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. अनेक भागात पुरपरिस्थितीत निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आले पिक पाण्यात वाहून गेले. मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले होते, त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. पण, शिंदे हे आलेच नाही. त्यामुळे नाराज झालेली शेतकरी तसे घरी परतले. पण, ही बाब लक्षात आल्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde ) व्हिडीओ कॉलवर सर्वांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. कार्यकर्त्यांच्या भेट, बैठकांमुळे मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याला विलंब होत होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नांदेड दौऱ्यासाठी खूप विलंब लागला. त्यांचा दौऱ्यात पुरग्रस्त भागाच्या पाहणीचा कार्यक्रम होता. पण ऐनवेळी दौऱ्याला उशीर झाल्याने त्यांनी अनेक कार्यक्रम रद्द केले. पूरग्रस्त गावात गावकरी त्यांची वाट पाहत उभे होते. पण मुख्यमंत्री यांचा ताफा न थांबल्याने शेतकरी नाराज झाले. मुख्यमंत्री नांदेडमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा न जाणून घेताच पुढे गेले हे समजल्यावर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, नांदेडमधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला. या गावातील शेतरकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. नांदेड हिंगोली भेटीदरम्यान या शेतकऱ्याची भेट घेण्याचे राहिल्यामुळे त्यांनी खास व्हिडीओ कॉल करून या शेतकऱ्यांची चौकशी केली. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचे सरकार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना नक्की दिलासा देऊ असे शिंदे यांनी या शेतकऱ्याला आवर्जून सांगितलं.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘ कावड यात्रे ‘ मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी सहभागी होत भगवान भोले शंकराचा जयघोष केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत मुखी भगवान भोलेनाथाचा जयघोष करित तसंच हाती भगवा झेंडा आणि त्रिशूळ घेऊन हजारो शिवभक्त आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे देखील सहभागी झाले होते. याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार संजय राठोड, आमदार बालाजी कल्याणकर तसेच हजारोंच्या संख्येने हिंगोलीकर शिवभक्त उपस्थित होते.