Monday, December 23, 2024

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात एका पत्रकाराला अटक; कटात सामील असल्याचा गुन्हा दाखल

- Advertisement -

Chandrakant Patil News: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.  पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात अटक केली आहे.  चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलीसांना सापडलं आहे. त्यानंतर गोविंद वाकडेंवर कटात सामील असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
 
पत्रकार संघटनांकडून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध 
 
मुंबई मराठी पत्रकार संघानं चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक अयोग्य व निषेधार्ह आहे. पण या शाईफेकीची बातमी टिपणाऱ्या पत्रकाराला अटक करण्याची मागणी त्याहून अधिक निषेधार्ह आहे. सदर पत्रकाराच्या अटकेसाठी आपण उपोषणास बसणार असल्याची धमकी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिली आहे. पाटील यांच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र शब्दांत निषेध करत आहे. पाटील यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी. त्यांनी तसे न केल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल असे मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यवाह ,संदीप चव्हाण यांनी म्हटले आहे.

काल चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करून राजकीय द्वेशातून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय. या तिघांनी देखील 307 सारखा गुन्हा केला नाही, परंतु, त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलाय, असं वकिलांनी म्हटलं आहे. 

सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे- राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे. पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे असे वाटते. 307 म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि 353 म्हणजे  सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?  मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने 700 हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांच्यावर 302 सह  ही कलमे का लावण्यात आले नाहीत, असं शेट्टींनी म्हटलं आहे. 

News Reels

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles