Monday, December 23, 2024

Kolhapur : गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी गोळीबार, हाणामारीत पाचजण जखमी, १० जण अटकेत

- Advertisement -

 Kolhapur : गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी गोळीबार, हाणामारीत पाचजण जखमी, १० जण अटकेत

म्हालसवडे : करवीर(kolhapur) तालुक्यातील मांडरे  येथे गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादा दरम्यान जेवणाच्या पंक्तीत मानाने पाणी सोडण्याच्या कारणावरून जोरदार  हाणामारी झाली. यावेळी एकाने गोळीबार देखील केल्याने गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, काठय़ा आणि दगडाने झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. उदय  पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील व रोहित पाटील अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या अभिजित सुरेश पाटील यांच्यासह बारा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर १० जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार झाल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडरे येथील हनुमान तरुण मंडळाने काल, शुक्रवार (दि.२) रोजी सायंकाळी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. येथील रीतिरिवाजानुसार महाप्रसादाच्या वाटपावेळी अगरबत्ती लावून, पंक्तीत हातावरून पाणी सोडून जेवणाची सुरुवात केली जाते. यावेळी पाणी सोडण्याच्या  मानापमानातून मंडळातीलच दोन गटात हाणामारी झाली. यात उदय  पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील व रोहित पाटील जखमी झाले.

हे ही वाचा – दररोज या 10 मंत्रांचा जप केल्यानं (Chanting 10 Mantras) टळतात संकटे ; देवी-देवतांची प्राप्त होते विशेष कृपा संपूर्ण पहा.

संशयित आरोपी अभिजीत पाटील याने बंदुकीचा परवाना नसताना फिर्यादी उदय पाटील यांच्यावर बारा बोअरच्या बंदुकीने जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. उदय पाटील हे बाजूला झाल्याने त्यांना गोळी लागली नाही. याबाबत उदय सोनबा पाटील यांनी आज, शनिवारी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.  

याप्रकरणी अभिजीत सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील, विकास बाजीराव पाटील, दादासो श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहुल कृष्णात पाटील व तुषार राजाराम पाटील (सर्व रा. मांडरे)  यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीरच्या पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून सहायक फौजदार निवास पवार  व प्रशांत पाटील यांच्यासहित गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles