Stock Market: सलग पाचव्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 60 हजार अंकावर बंद झाला होता. सकाळी बरीच विक्री होऊन बराच काळ निर्देशांक कमी झाला होता. मात्र बाजार बंद होताना खरेदी होऊन या निर्देशांकाने गुरुवारी 60,000 अंकाची पातळी कायम ठेवण्यात यश मिळविले.
बाजार बंद होताना कालच्या तुलनेत सेन्सेक्स 37 अंकांनी वाढून 60,298 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 12 अंकांनी म्हणजे 0.07 टक्क्यांनी वाढून 17,956 अंकावर बंद झाला. हा निर्देशांक 18,000 अंकाकडे आगेकुच करील अशी अशा बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दीपक जसानी यांनी सांगितले की, इतर देशाच्या तुलनेत भारताची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यामुळे देशातील गुंतवणूकदाराबरोबरच परदेशातील गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रीड, इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
Rupee vs Dollar : रुपयाच्या मूल्यात भरघोस सुधारणा
तर डॉ. रेड्डीज, विप्रो, महिंद्रा, इन्फोसिस, ऍक्सिस बॅंक, नेस्ले या कंपनीच्या शेअरच्या भावात घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप 0.42 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.34 टक्क्यांनी वाढला. रिऍल्टी, भांडवली वस्तू, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, वाहन, धातू, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रातील कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर झाले आहे.
यात महागाईला रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची भाषा करण्यात आली असली तरी या सर्वांचा परिणाम अगोदरच होऊन गेला आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारामध्ये खरेदी करीत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये आता फार मोठे करेक्शन होणार नाही असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्ही.के. विजयकुमार यांनी सूचित केले. बुधवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी तब्बल 2,347 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यावरून परदेशी गुंतवणूकदारांच्या मनस्थितीचा अंदाज येतो.