Political Big News | 50 खोके, एकदम ओके, आले रे आले गद्दार आले; धनुभाऊंच्या जबरदस्त घोषणा
मुंबई : अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला, बीडचे DM…अर्थात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी(Dhananjay Munde). 50 खोके…आले आले…आणि 50 खोके, एकदम ओके…या घोषणांनी धनंजय मुंडेंनी शिंदे गटाचे आमदार आणि भाजपला डिवचण्याचं काम केलं.
पावसाळी अधिवेशनाचा( monsoon session) पहिला दिवस म्हटलं की, घोषणा आल्याच…शिंदे-भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर जमलेही. पण लक्ष वेधून घेतलं धनुभाऊंनी.
धनंजय मुंडे 50 खोक्यांच्या घोषणा देत होते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार गालातल्या गालात हसत होते. बरं धनंजय मुंडेंची ही एकच घोषणा गाजली असं नाही. तर धनुभाऊंच्या यापुढच्या घोषणाही फार इंटरेस्टिंग होत्या. मुंडेंच्या घोषणा सुरु असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आले आणि धनंजय मुंडेंनी आपल्या घोषणांचा ट्रॅक बदलला. सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या,
सरकारचा धिक्कार असो, अशा अजब घोषणाही ऐकायला मिळाल्या. सुधीर मुनगंटीवारांनंतर धनजंय मुंडेंनी आपला मोर्चा शेलारांकडे वळवला. तर शेलारांनी हात वारे करुन धनंजय मुंडेंच्या घोषणाबाजीला प्रतिसाद दिला. विरोधकांच्या ज्या घोषणा सुरु होत्या, त्यात आदित्य ठाकरेही होते. आदित्य ठाकरेंनी शिंदे-भाजप सरकारला पुन्हा गद्दार सरकार म्हटलं. त्यानंतर शेलारांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
पहिल्या दिवसाचं कामकाज अधिक चाललं नाही. प्रस्ताव मांडताना संबंधित वर्षाचा नीट उल्लेख आणि कामकाज सोडून मंत्री सभागृहाच्या बाहेर गेल्यानं अजित पवार चांगलेच संतापले. कामकाज सुरु होताच, सरकारनं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला…मात्र काँग्रेसच्या नाना पटोलेंनी तात्काळ नुकसानग्रस्त शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली…त्यावर सरकार लवकरच निवेदन करेल, असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.
कामकाजापेक्षा अधिवेशनाचा पहिला दिवस तर धनंजय मुंडेंच्या घोषणांनीच गाजला. आता दुसऱ्या दिवशी विरोधक कोणती स्ट्रॅटर्जी घेऊन येतात ते दिसेलच.