Rupee vs Dollar : रुपयाच्या मूल्यात भरघोस सुधारणा
मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचबरोबर शेअर बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून गुंतवणूक वाढली आहे. परिणामी डॉलरचा भारतातील ओघ वाढल्यामुळे रुपयाच्या मूल्यात बुधवारी 29 पैशाची सुधारणा होऊन रुपयाचा भाव 79.45 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती आता 92 डॉलर प्रति डॉलर इतक्या खाली आहेत. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला आणि रुपयाला मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे. भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चे तेल आयात करतो आणि आतापर्यंत यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागत होते.
त्यामुळे भारतातील परकीय चलनाचा साठा कमी होऊन रुपयाचा भाव कमी होत होता. मात्र आता एकीकडे शेअर बाजारात परकीय गुंतवणूक येत असतानाच भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी कमी डॉलर मोजावे लागत आहेत. त्यामुळे रुपयाच्या मूल्यात वेगाने सुधारणा होत आहे. भारताचा विकास दर जगातील इतर सर्व देशापेक्षा जास्त असणार असल्यामुळे भारतातून चांगला परतावा मिळेल या दृष्टीकोनातून परकीय संस्था गुंतवणूकदार भारतामध्ये शेअरची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.
त्याच बरोबर रशिया- युक्रेन युद्धाचा प्रभाव कमी झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी सुधारू लागली आहे. त्यामुळे भारत आयात करीत असलेल्या अनेक वस्तूंच्या किमती कमी होत आहेत. त्यातल्या त्यात सेमी कंडक्टरच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे भारताला आता कमी महागाईचा सामना करावा लागणार आहे. याचा सकारात्मक परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.