मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी (Ambani family threatened) देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयित बिष्णू विदू भौमिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्यात उपायुक्त निलोत्पल यांनी याप्रकरणी चौकशी केली आहे.
अंबानी कुटुंबाला धमकी देणारा मानसिक रुग्ण आहे, यापूर्वीही त्याने अशा प्रकारचं कृत्य केल्याचं पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. आयपीसी कलम 506 पार्ट 2 नुसार बिष्णू विदू भौमिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिष्णू विदू भौमिक हा व्यवसायाने ज्वेलर आहे, त्याचं दक्षिण मुंबईमध्ये दुकान आहे. भौमिक याचं वय 50 च्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे. भौमिक याने स्वत:च्या मोबाईलवरून 8 फोन केले, त्याने केलेल्या कॉलमध्ये मुकेश अंबानी यांच्या नावाने धमकी दिली. अंबानी कुटुंबाचा त्याने धमकीमध्ये उल्लेख केला नाही, असंही तपासात समोर आलं आहे.